मनपा एम पश्चिम विभागातील जल विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जनआक्रोश; वृद्ध महिलेनं फिनायल पिऊन आत्महत्येचा केला प्रयत्न

मुंबई, चेंबूर | प्रतिनिधी
मुंबई : चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील नागवाडी परिसरात मनपा एम पश्चिम विभागातील जल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक जनतेत तीव्र रोष पाहायला मिळत आहे. येथील सहायक जल अभियंता मिथुन भिसे, सब इंजिनिअर करमरकर, ज्युनियर इंजिनिअर मंचेकर आणि मुकादम संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कादरिया नगर, नागवाडी परिसरात हजारो लोकांनी अवैध नलजोडणी घेतली असून, त्या बदल्यात या अधिकाऱ्यांकडून दररोज अवैध वसूली केली जाते. विशेष म्हणजे, अधिकृत नलजोडणी घेणाऱ्यांकडूनही जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. मुकादम संदीप पाटील हे दररोज या भागात येऊन कोणाचातरी नल कापून ठेवतात आणि पैसे दिल्यानंतरच पुन्हा जोडणी देतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या भ्रष्टाचाराचा थेट परिणाम नुकताच एका ७० वर्षीय वृद्ध विधवा महिलेवर झाला. संदीप पाटील यांनी तिच्या घरचा नल कापल्याने तीने मनस्तापातून फिनायल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेवर राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात आला. या घटनेनंतर नागरिकांनी संतापून पाटील यांना घेराव घातला, मात्र काही समाजसेवकांनी हस्तक्षेप करून त्यांना बचावले.
या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी एम पश्चिम विभागाच्या कार्यालयात जाऊन जोरदार निषेध केला. सहायक जल अभियंता मिथुन भिसे यांनी लोकांची माफी मागून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी भिसे, पाटील व इतर दोषी अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी केली आहे. स्थानिकांचे आरोप आहेत की, जल विभागाचे हे अधिकारी स्थानिक वार्ड अधिकाऱ्यांनाही पैशाचा वाटा देतात, म्हणूनच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.