
‘मोहता शाळा’जवळील दुकानातून लहान मुलांच्या भविष्यात विष कालवले जात आहे!
“मी दर महिन्याच्या १ तारखेला API श्री. जगदीश बांगर यांना ४८०० रुपये हप्ता देतो, त्यामुळे कोणी काही करत नाही.” गुटखा माफिया
बुलढाणा (प्रतिनिधी : बाबा मिर्झा)
नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडनेर भोलजी येथे ‘मोहता शाळा’ जवळील माऊली स्टोअर्ससमोर असलेल्या एका दुकानात अवैधपणे विमल गुटख्याची होलसेल विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या दुकानातून लहान मुलांपासून ते शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत गुटखा विकला जात असून, स्थानिक पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
२५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, ‘दैनिक जागृत मालक’चे प्रतिनिधी बाबा मिर्झा यांनी या दुकानात स्वतः जाऊन मोठ्या प्रमाणात विमल गुटख्याची बेकायदेशीर विक्री होताना पाहिली. तत्काळ नांदुरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली.
थोड्याच वेळात दोन पोलिस कर्मचारी श्री. शकील तडवी आणि श्री. नवाज शेख हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, गुटखा जप्त करण्याऐवजी त्यांनी केवळ औपचारिक चौकशी करून गुटखा विक्रेत्याला मोकळे सोडले आणि घटनास्थळ सोडून दिले.
या विक्रेत्याने पोलिस कर्मचारी श्री. शकील तडवी, श्री. नवाज शेख आणि प्रतिनिधीसमोर स्पष्टपणे सांगितले की,
“मी दर महिन्याच्या १ तारखेला API श्री. जगदीश बांगर यांना ४८०० रुपये हप्ता देतो, त्यामुळे कोणी काही करत नाही.”
हा खुलासा धक्कादायक असून पोलीस आणि गुटखा माफियांमधील संगनमताचं हे जिवंत उदाहरण आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेजवळ अशा प्रकारे गुटखा विक्री होणे म्हणजे लहान मुलांच्या आरोग्यावर आणि भविष्यावर सरळ हल्लाच आहे. पालकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे.
जेव्हा पोलीसच अशा अवैध धंद्यांचे रक्षण करतात, तेव्हा सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?
या दुकानाचा मालक श्री. ताठे असून, तोच गुटख्याचा साठा करून परिसरात वितरित करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हा गुटखा बाहेरून चोरून आणला जातो आणि वडनेर भोलजी परिसरात खुलेआम विकला जातो.
हा प्रकार अत्यंत गंभीर असून, वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी त्वरित लक्ष घालून स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि या गुटखा रॅकेटचा पाळोमुळासकट बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
‘दैनिक जागृत मालक’ हा प्रकार थांबेल तोपर्यंत पाठपुरावा करत राहील. गावकऱ्यांच्या आवाजाला बुलंद करत, अशा भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करत राहील.
