
राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : बुलडाणा जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
बुलडाणा, महाराष्ट्र – जिल्ह्यात ज्वलनशील पदार्थांच्या अवैध साठवणुकीस व विक्रीस बंदी असतानाही, नांदुरा पोलीस स्टेशन व वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत बायोडिझेलचे अवैध पंप सर्रासपणे सुरू असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या बेकायदेशीर व्यवहाराला महसूल, पोलीस व पुरवठा विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे “आशीर्वाद” लाभल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
विशेष म्हणजे, इमरान घासलेटवाले व इतर काही व्यक्ती रात्रंदिवस बायोडिझेलचा व्यापार करत असून, हे पंप राष्ट्रीय महामार्गालगत सुरू आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.
स्थानिकांनी याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक (@DGPMaharashtra), मुख्यमंत्री (@CMOMaharashtra) आणि बुलडाणा जिल्हा पोलीस (@BuldhanaPolice) यांना ट्विटरवरून थेट तक्रार करत, तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “ही केवळ कायद्याची पायमल्ली नाही, तर संभाव्य मोठ्या अपघाताचे निमंत्रण आहे,” असे एका पत्रकाराने सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यात यापूर्वीही ज्वलनशील पदार्थांमुळे दुर्घटना झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे.
सरकार काय कारवाई करणार? या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अवैध धंद्याला पाठीशी घालणाऱ्यांना शासन रोखणार का? हा प्रश्न सध्या स्थानिक जनतेच्या मनात घर करून आहे.
दैनिक जागृत मालक कडून सतत अपडेट्ससाठी लक्ष ठेवा.