विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती समस्या सोडविण्यासाठी बुलढाण्यात दाखल…
एसपी ऑफिसमध्ये तणाव! आत काय घडतंय? जिल्ह्याचे एसपी कोण? पानसरे की तांबे…. दोघेही एसपी ऑफिसमध्ये… पानसरेंनी खुर्चीचा ताबा घेतल्याची चर्चा
बुलढाणा (प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या देखरेखीसाठी नेमले गेलेले सर्वोच्च पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी), सध्या खुर्चीसाठीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकाचवेळी दोन एसपी ऑफिसात दाखल झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्याचे एसपी नेमके कोण? असा पेच जिल्ह्यात निर्माण झाला आहे.
खुर्चीचा संघर्ष – पानसरे Vs. तांबे
गेल्या आठवड्यात एसपी विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली होती. तांबे यांनी नियुक्तीच्या दिवशीच पदभार स्वीकारून कामकाज सुरू केलं होतं. मात्र, आठ महिन्यांत बदली झाल्याने अन्याय झाल्याची भावना असलेल्या पानसरे यांनी बदलीच्या निर्णयाला कॅट (Central Administrative Tribunal) मध्ये आव्हान दिलं.
कॅटनं त्यांच्या बाजूने स्थगिती दिल्याने आज विश्व पानसरे अचानक एसपी ऑफिसात दाखल झाले आणि त्यांनी खुर्चीचा ताबा घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे निलेश तांबे हे देखील ऑफिसात हजर असून, त्यांनी कालच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या होत्या.
एसपी ऑफिसात दोन एसपी – अधिकारी आणि कर्मचारी संभ्रमात
सध्या दोन्ही अधिकारी – पानसरे आणि तांबे – एसपी ऑफिसात एकाचवेळी उपस्थित आहेत. वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्याची यंत्रणा संभ्रमात सापडली आहे. कोण एसपी म्हणून आदेश देणार? कोणाच्या सहीने फाईल पुढे जाणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक दाखल – तणाव निवळणार का?
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक स्वतः बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळू नये आणि प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का लागू नये, यासाठी ही हस्तक्षेपाची गरज भासली आहे.
जनतेमध्ये चिंता – कायदा सुव्यवस्थेचं काय?
जिल्ह्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा भार ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच अधिकारी आता खुर्चीसाठी संघर्ष करत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. प्रशासनाच्या या अंतर्गत संघर्षामुळे गुन्हेगारी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, तपासकार्य या बाबी मागे पडत आहेत.
न्यायप्रविष्ट प्रकरण, पण कार्यरत अधिकारी दोन?
कॅटने बदली आदेशावर स्थगिती दिली असली तरी यावर शासनाचे किंवा गृह विभागाचे स्पष्ट निर्देश अपेक्षित आहेत. तोपर्यंत एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांचे अस्तित्व ही शासकीय प्रक्रियेतील अनिश्चितता आणि अनागोंदी अधोरेखित करत आहे.
सरकार आणि गृह विभाग यांची भूमिका महत्त्वाची
ही परिस्थिती केवळ प्रशासनिक नव्हे तर कायद्याच्या दृष्टीनेही गंभीर आहे. राज्य सरकार आणि गृह विभाग यांनी तात्काळ स्पष्टता आणणं गरजेचं आहे. अन्यथा पोलिस दलात शिस्तीचा बधिरपणा निर्माण होऊ शकतो आणि याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या सुरक्षिततेवर होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस दलात सुरू असलेला हा ‘खुर्ची संघर्ष’ फक्त अधिकारांपुरता मर्यादित नसून, तो जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो. हे चित्र पोलिस खात्याच्या प्रतिमेला आणि जनतेच्या विश्वासाला सुरुंग लावणारे आहे. तात्काळ निर्णय घेऊन हा पेच सुटणे हे सरकारपुढील अत्यंत महत्त्वाचं आव्हान बनलं आहे.