
उल्हासनगरात चेटीचंड महायात्रेत सिंधी संस्कृतीची झलक, हजारो भाविकांचा सहभाग
उल्हासनगर : सिंधी समाजाचा सर्वांत मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेटीचंड निमित्त उल्हासनगरात भव्य महायात्रेचे आयोजन करण्यात आले. झुलेलाल मंदिराजवळून सुरुवात झालेल्या या महायात्रेचा समारोप रात्री स्वामी शांती प्रकाश आश्रम येथे झाला. या यात्रेत सिंधी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले.
सिंधी समाजाचे आराध्यदैवत साई झुलेलाल यांच्या अवतरण दिनानिमित्त दरवर्षी उल्हासनगरातून भव्य महायात्रा काढण्यात येते. यंदाही हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले. यात्रेसाठी शहरभर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, तसेच मुख्य चौकांमध्ये भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. संपूर्ण शहरात यात्रेचे जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यात्रेत विविध प्रकारचे रथ सजविण्यात आले होते. त्यामध्ये भगवान झुलेलाल, श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान हनुमान, भगवान शंकर आणि अन्य देवदेवतांचे रथ लक्ष वेधून घेत होते. पारंपरिक पोशाख परिधान करून सिंधी समाजातील महिला व पुरुष यात्रेत सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या तालावर संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.
या महायात्रेत विविध समाजांचे नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक एकतेचा संदेश देत या यात्रेने धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवले. यात्रेत सहभागी भाविकांसाठी महायात्रा महोत्सव समिती व सामाजिक संघटनांकडून जेवण, नाश्ता, पाणी आणि थंड पेय आदी सुविधा करण्यात आल्या होत्या.
उल्हासनगरातील चेटीचंड महायात्रा ही सिंधी समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असून, या यात्रेद्वारे समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडते. संपूर्ण शहर या यात्रेच्या निमित्ताने भक्तिरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळाले.













