
तुमसरच्या तरुणांचा बंड – ‘लाडका भाऊ योजना अंतर्गत प्रशिक्षण ३ वर्षे वाढविण्याची जोरदार मागणी
(पंकज चौरसिया, प्रतिनिधी) तुमसर, ३० डिसेंबर २०२४
तुमसर तालुक्यातील बेरोजगारीच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा देण्यासाठी इनसानियात फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजना (लाडका भाऊ योजना) सुधारण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या मागण्यांसाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून तसेच ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.
काय आहेत सुधारणा मागण्या?
*१. प्रशिक्षण कालावधी वाढवणे: सध्याचा सहा महिन्यांचा कालावधी अपुरा असल्याने, तो किमान तीन वर्षांचा करण्याची मागणी करण्यात आली आहे.*
२. मानधन वाढवणे: प्रशिक्षणार्थींना सध्या मिळणाऱ्या ₹१०,००० च्या मानधनाचा विचार करता, महागाईच्या काळात ते अपर्याप्त आहे. *त्यामुळे मानधन ₹२०,००० करण्याचा आग्रह आहे.
३. सरकारी कर्मचाऱ्यांसारखे फायदे: आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, प्रसूती लाभ यांसारखे फायदे मिळावे.
४. प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी: प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय नोकरीची हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
२०१८ ते २०२२ दरम्यान महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण १५% ने वाढल्याचे डोंगरे यांनी नमूद केले. “बेरोजगारीमुळे तरुण चुकीच्या मार्गावर जात आहेत. रोजगार म्हणजे केवळ नोकरी नाही, तर समाजाला स्थैर्य देणारी पायरी आहे,” असे मत डोंगरे यांनी व्यक्त केले.
“सुधारणा ही केवळ मागणी नाही, तर तरुणांच्या हक्काचा प्रश्न आहे!”
त्यांनी सांगितले की, या सुधारणा तातडीने लागू झाल्यास राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.
तत्काळ सुधारणा होणार का?
फाऊंडेशन व प्रशिक्षणार्थीच्या प्रयत्नांमुळे प्रशासन जागे होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि कौशल्यविकास योजनेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने आता तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
या निवेदन सादरीकरणावेळी इनसानियात फाऊंडेशनचे सदस्य आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाऊंडेशन चे अध्यक्ष अनिकेत डोंगरे, हर्षल मलेवर (सहसचिव), पंकज चौरसिया (सदस्य), कुणाल भोयर (सदस्य), प्रगती रहंगडाले (को-ऑर्डिनेटर) यांचा समावेश होता. तसेच प्रशिक्षणार्थी राहुल डोंगरे, देवेंद्र गिरडकर, अंकित लांजेवार, विजेंद्र महाकाळकर, शुभम देशकर, अमित दमाहे, अश्विनी अतकरी, आरती रहंगडाले, रोहिणी अंबुले, विश्वकला कुकडे, विकी बिरणवारे, योगेंद्र उमरकर, जयंत बघेले, दीपांशू पांडे, आचल वैद्य, दिव्या कटरे, हितीक्षा शिवणकर, राहुल तितिरमारे, तुषार गणविर, ललित मेहर, रोशनी सार्वे, प्रियंका जांगळे, आरती रहंगडाले यांसारख्या तरुणांनी आपला सहभाग नोंदवला.
_”तरुणांचा आवाज आता प्रशासनाच्या दरवाजावर ठोठावत आहे. ही सुधारणा त्यांचं भविष्य बदलू शकते!”