
बुलढाणा: भरधाव टिप्परच्या धडकेत दोन नातवंडांचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी टिप्पर पेटवला
बुलढाणा (९ मे) – जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाळू, गिट्टी, मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर वाहनांच्या बेजबाबदार आणि भरधाव वाहतुकीमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास माऊली फाटा, भेंडवळ येथे एका भरधाव टिप्परच्या धडकेत दोन बालकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आजी-आजोबांना गंभीर दुखापत झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकाश महादेव खेडकर हे आपल्या पत्नी साधना खेडकर आणि दोन नातवंडांसोबत – पार्थ चोपडे (वय ६, रा. राजापेठ, अमरावती) व युवराज भागवत (वय ५, रा. वडनेरा) – दोनचाकी वाहनाने पळशी सुपो येथून शेगाव कडे जात होते. त्यावेळी माऊली फाटा येथे मागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दोन्ही अल्पवयीन नातवंडांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत टिप्पर वाहनाला पेटवून दिले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस आणि खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रमिक लोढा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे घडला याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील रेती माफियांच्या बेकायदेशीर वाहतुकीचा आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीमुळे नागरिक आता संतप्त होऊन कायद्याचा न्याय स्वतःच्या हातात घेऊ लागल्याची लक्षणं दिसू लागली आहेत.
