
वडनेर भोलजी (ता. नांदुरा) – नांदुरा तालुक्यात अवैध व्यवसायांनी मोकाट दिल्याचे गंभीर चित्र समोर येत असून, पोलीस प्रशासनाच्या कथित आशीर्वादाने बायो डिझेल व नशा माफियांचा धुमाकूळ सुरु आहे. या प्रकरणात ओ.पी. इन्चार्ज API जगदीश बांगर यांचे नाव चर्चेत असून, त्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे फोफावत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
राशिद अली खान लियाकत अली खान हे फिरोज ढाबा मागे आणि हॉटेल साई सुकून (जमील जामदार यांची मालकी) येथे ज्ञानेश्वर डामरे नावाच्या एका गुजराती बायो माफियासोबत मिळून अवैध बायो डिझेलचे पंप चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. नायगांव फाटा परिसरात हे पंप खुलेआम चालवले जात असून, स्थानिक प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे.
याशिवाय हॉटेल गुरुकृपा येथे छोटू सेठ यांनी पंजाबहून आलेल्या एका सरदार नशा माफियाला आश्रय दिला असून, तो आफ्युन व नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी बायो डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थही विक्रीस ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या साऱ्या अवैध धंद्यांचा होलसेल माफिया चिराग याला राशिद अली खान व मलकापूर येथील तडीपार, नकली नोट प्रकरणातील आरोपी असलेल्या नेत्याचे संरक्षण मिळत असल्याने संपूर्ण मलकापुर व नांदुरा हद्दीत अशा प्रकारचे व्यवसाय वाढीस लागले आहेत.
या अवैध धंद्यांमुळे युवकांना नशेच्या गर्तेत ओढले जात असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करणे आवश्यक असून, अन्यथा तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.