चांदूर बिस्वा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा स्फोट; सरपंच पतीवर गंभीर आरोप
चांदूर बिस्वा (ता. नांदुरा): गावातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पती श्री. प्रकाश बोडवडे यांच्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रकारचे अनियमित व्यवहार, भ्रष्टाचार व अवैध व्यवसायांना अभय मिळाल्याची तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांनी जिल्हा प्रशासन व ग्रामविकास विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
गावाच्या मुख्य चौकात आणि सार्वजनिक रस्त्यांवर बिनधास्तपणे अनधिकृत चिकन विक्री सुरू आहे. त्यामुळे शाकाहारी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, स्वच्छता व आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे.
यासोबतच, सरपंच पती श्री. बोडवडे यांनी ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत कोणतीही परवानगी न घेता बोरिंग करून अनधिकृत पाणीपुरवठा व्यवसाय सुरू केला आहे. या पाण्याची विक्री करून वैयक्तिक नफा घेतला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तसेच गावातील अनधिकृत चिकन विक्रेत्यांकडून मासिक हप्ता घेत असल्याचे आरोपही झाले असून, त्यामुळे संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना संरक्षण मिळत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित यंत्रणांनी त्वरित विशेष तपासणी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.