काल ‘माल’ आला… १५,००० लिटर बायोडिझेल भूमिगत टाकीत लपवले!
मलकापूर (प्रतिनिधी) – मलकापूर शहरात बायोडिझेल माफियांचे धाडसी कारनामे पुन्हा एकदा उघडकीस आले असून, फौजी ढाबा, धारागाव (शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत) येथे तब्बल १५,००० लिटरपेक्षा अधिक ज्वलनशील बायोडिझेलचा साठा भूमिगत टाकीत लपवण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १०.१५ वाजेच्या दरम्यान व्होल्सले माफिया चिराग यांच्या टँकरद्वारे हा साठा आणण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
या अवैध साठ्याचे मुख्य सूत्रधार म्हणून साबीर कुरेशी, शेख इमरान लुकमान बॉस आणि जुबेर टोपी (फर्निचर) या तिघांची नावे पुढे येत असून, या साठ्यामागे शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांचे वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या आशीर्वादानेच ही अवैध विक्री रात्री बेरात्री सुरू असते.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बायोडिझेल पंप बंद असताना, मलकापूर शहरात मात्र हे पंप खुले असून, ही बाब नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर ठरत आहे. भूमिगत टाकीत लपवलेला ज्वलनशील साठा भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडवू शकतो.
सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी प्रशासन व पोलिस यंत्रणेला तीव्र इशारा दिला आहे की, त्वरित कारवाई करून भूमिगत टाकी उघडून ती जमीन बाहेर काढावी, साठा सील करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा भविष्यात जर काही अनर्थ घडला, तर संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि पोलिस यंत्रणांची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.