नाशिक: दिंडोरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता, शिस्तभंग नियमांचे उल्लंघन करत खासगी वृत्तपत्रांकडून बेकायदेशीररीत्या पुरस्कार स्वीकृत केले आहेत. याबाबत निगडोळ येथील रहिवासी भास्कर मालसाने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार दिंडोरी तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतच्या अधिकारी श्रीमती वनिता चौधरी, कुर्णोली ग्रामपंचायतीच्या श्रीमती राजश्री सनेर, तसेच श्रीमती वैशाली बागुल, श्रीमती रोहिणी काथपुरे आणि श्री रामदास गायखे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मीडिया समूहाशी संलग्न पुरस्कार स्वीकृत केले आहेत.
शासनाच्या नियमांनुसार, कोणताही शासकीय कर्मचारी आकाशवाणीवरील ध्वनीप्रक्षेपण, दूरदर्शनवरील कार्यक्रम, वृत्तपत्र किंवा नियतकालिकांमधील लेख किंवा पत्रलेखन, तसेच सार्वजनिक समारंभात मान्यतेशिवाय सहभागी होऊ शकत नाही. ‘शिस्त व अपील अनुच्छेद १३’ नुसार, शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही स्वरूपाचे प्रशस्तिपत्र किंवा पुरस्कार शासनाची पूर्वमंजूरी शिवाय स्वीकारू नये.
या पार्श्वभूमीवर, वरील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायांचे गांभीर्य लक्षात घेता, संबंधित अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी करून – त्यांनी घेतलेल्या परवानग्या, कार्यालयीन पत्रव्यवहार, विकासकामांची नोंद – आदींचा तपशीलवार अभ्यास करून, त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
तक्रारीची प्रत माहितीसाठी व उचित कारवाईसाठी एकनाथराव डवले (प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई), प्रवीण गेडाम (विभागीय आयुक्त, नाशिक), मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड यांना पाठवण्यात आली आहे.