नांदुरा येथील पंचर गँगची दहशत, पोलीस कारवाईचे प्रश्नचिन्ह
नांदुरा (प्रतिनिधी): नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुर्ती येथील अनंता प्रकाश काळे (वय ५३) या आपल्या पतीसोबत दवाखान्याच्या कामासाठी खामगावला जात असताना २६ डिसेंबर रोजी त्यांच्यावर दरोडा टाकण्यात आला. खामगाव येथील किड्स युनिव्हर्स इंग्लिश शाळेजवळील गतीरोधकाजवळ, दुचाकीचा वेग कमी केल्यावर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या पतीच्या गळ्यातील ७०,००० रुपये किमतीची सोन्याची पोथ हिसकावली आणि खामगावच्या दिशेने पळ काढला.
या प्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अज्ञात इसमांविरुद्ध ३०९ (४), ३(५) भादंवीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नांदुरा परिसरात पुन्हा एकदा कुख्यात “पंचर गँग”चे नाव चर्चेत आले आहे. पंचर गँगचा प्रमुख “पंचर डॉन” आणि त्याच्या सदस्यांवर संशय व्यक्त होत आहे. या गँगने याआधीही अनेक घटना घडवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी आणि बातम्यांमधून या गँगविरुद्ध आवाज उठवूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
गँगच्या हालचालींची चौकशीची मागणी
स्थानिक नागरिकांच्या मते, पंचर गँगच्या सदस्यांचे मोबाईल, लॅपटॉप, आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आल्यास महत्त्वाचे पुरावे उघड होण्याची शक्यता आहे. गँगचे मुख्यालय व घरांवर छापे टाकून झाडाझडती घेतल्यास गंभीर बाबी समोर येऊ शकतात. तरीही पोलीस यावर कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदुरा आणि आसपासच्या भागात पंचर गँगच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांची मागणी
नांदुरामधील नागरिकांनी पंचर गँगविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या प्रकाराचा योग्य तपास करून संबंधितांना अटक करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात आले आहे.