
खामगांव (जिल्हा बुलढाणा): खामगांव बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले असून, यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. मात्र, स्थानक प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, खामगांव बस स्थानक प्रमुख स्वाती तांबटकर आणि अन्य स्थानक प्रशासनातील व्यक्ती हे ठराविक व्यावसायिकांकडून अवैध मार्गाने पैसे स्वीकारत असून, त्यांना मनमानीपणे मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्याची परवानगी दिली जात आहे. परिणामी, प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या स्थानकाच्या भिंती आणि परिसर जाहिरातींनी भरून गेले आहेत.
स्थानक परिसरातील अनधिकृत जाहिरातींमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रवासी बस वेळापत्रक पाहू शकत नाहीत, तसेच या बॅनरमुळे परिसर अस्वच्छ आणि अनागोंदी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
प्रशासनाकडून कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, खामगांव बस स्थानकाच्या प्रमुखांवर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अपेक्षित
यासंदर्भात खामगांव बस स्थानक प्रमुख स्वाती तांबटकर यांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही खुलासा दिलेला नाही. दरम्यान, या गैरप्रकाराची चौकशी करून योग्य कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


